अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार २५ सप्टेंबर २०२५ रोजी गोपाल नगर रेल्वे क्रॉसिंग परिसरात व्यापक अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. सकाळपासूनच सुरू झालेल्या या कारवाईत क्रॉसिंगलगतच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमणे हटवून जागा मोकळी करण्यात आली.
या मोहिमेत रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी अवैध बांधकामे, फड व विविध साहित्य जप्त करण्यात आले. जप्त माल महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आला असून, या कारवाईमुळे परिसर स्वच्छ, सुरक्षित व मोकळा झाला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून वाहतुकीतही सुधारणा झाली आहे.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्पष्ट केले की, “शहरातील कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण सहन केले जाणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी, सुरक्षिततेसाठी आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी मनपाची मोहीम पुढेही सातत्याने राबविली जाईल.” त्यांनी नागरिकांना सार्वजनिक रस्ते, फूटपाथ व सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण न करण्याचे आवाहन करत सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कारवाईदरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागासोबत अभियंते, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या धडक मोहिमेमुळे अतिक्रमणकर्त्यांना धडा मिळाल्याचेही नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.







