अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी २९ सप्टेंबर २०२५ रोजी निंभोरा फायर स्टेशन, नगरोत्थान योजनेतील रस्ते आणि सावता मैदान सांस्कृतिक भवन या महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी केली. प्रत्येक काम वेळेत पूर्ण व्हावे आणि त्यात गुणवत्ता, सुरक्षितता व नागरिकांच्या सोयीला प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
निंभोरा फायर स्टेशनच्या कामाचे बारकाईने परीक्षण करून आयुक्तांनी बांधकाम मजबूत आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम राहावे यावर भर दिला. नगरोत्थान योजनेतील बारीपुरा ते गांधीनगर रेल्वे क्रॉसिंग रोड आणि होलीक्रॉस नवी वस्ती रोड यांच्या पाहणीत रस्त्यांचे दर्जेदार बांधकाम करून नागरिकांना अडथळामुक्त वाहतूक सुविधा द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले.
सावता मैदान सांस्कृतिक भवनाच्या प्रगतीचा आढावा घेताना आयुक्तांनी सुरक्षितता, बांधकामाची मजबुती आणि कामकाजाचा वेग यावर विशेष भर दिला. “कोणतीही हलगर्जीपणा न करता प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करा,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.
या पाहणीदरम्यान शहर अभियंता, अग्निशमन विभाग प्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांच्या काटेकोर मार्गदर्शनामुळे विकासकामांना अपेक्षित गती मिळून नागरिकांना सुविधा वेळेत उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.














