शहरातील नागरिकांना सकस, आरोग्यदायी आणि आनंददायी वातावरण मिळावे, यासाठी अमरावती महानगरपालिका “हॅप्पी स्ट्रीट प्रोग्राम (Raahgiri)” हा अभिनव उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता महापालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये प्राथमिक बैठक घेण्यात आली. बैठकीस आयुक्त सौम्या शर्मा चांडक अध्यक्षस्थानी होत्या.
बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी, विभागीय समन्वय, नागरिकांचा सहभाग, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा आणि सांस्कृतिक उपक्रम याबाबत सविस्तर चर्चा झाली. या वेळी वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, “हॅप्पी स्ट्रीट प्रोग्राम म्हणजे केवळ एक कार्यक्रम नाही, तर शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात उत्साह निर्माण करणारी संकल्पना आहे. नागरिकांना आनंददायी आणि सकस वातावरण देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल,” असे त्यांनी नमूद केले.
देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये यशस्वी ठरलेला “Raahgiri” आता अमरावतीत सुरू होणार आहे. या अंतर्गत शहरातील निवडक मुख्य रस्ते सकाळी काही तासांसाठी वाहनमुक्त ठेवले जातील. त्या वेळेत नागरिकांना चालणे, धावणे, सायकल चालविणे, योगाभ्यास, नृत्य, खेळ, संगीत, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांचा आनंद घेता येईल.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्यवर्धक जीवनशैलीची प्रेरणा मिळेल आणि सामाजिक ऐक्य वाढेल. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय समन्वय, नागरिकांचा सहभाग आणि शिस्तबद्ध नियोजनावर विशेष भर दिला जाईल.
आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले की, “हॅप्पी स्ट्रीट” उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक अमरावतीकराने उत्साहाने सहभाग घ्यावा आणि शहराचे नाव उज्ज्वल करावे. इच्छुक नागरिकांनी आपले प्रस्ताव आयुक्त कार्यालयात सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले.
या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी कौशल्या एम., अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, डॉ.मेघना वासनकर, नरेंद्र वानखडे, अॅड. प्रशांत देशपांडे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, दिपक खडेकार, अविनाश रघटाटे, क्रीडा अधिकारी प्रविण ठाकरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटना उपस्थित होत्या.
अमरावती महानगरपालिकेचा “हॅप्पी स्ट्रीट (Raahgiri)” उपक्रम शहरात नवचैतन्य निर्माण करणार असून नागरिकांना आरोग्यदायी, सुसंवादी आणि आनंदी जीवनशैलीकडे नेणारा ठरणार आहे.





