आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची जुना कॉटन मार्केट परिसराला भेट — फुल विक्रेत्यांच्या नियोजनासह स्वच्छतेसाठी निर्देश

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज (२८ ऑक्टोबर २०२५) जुना कॉटन मार्केट परिसराची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील फुल विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या विक्रीच्या ठिकाणांची पाहणी केली आणि त्यांच्यासाठी नियोजित जागा निश्चित करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या.

आयुक्तांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला निर्देश दिले की, कॉटन मार्केट परिसरातील फुलवाल्यांच्या विक्रीसाठी योग्य व नियोजित जागा ठरवून त्यांना तेथे स्थलांतरित करावे. तसेच, परिसरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देऊन निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, असेही त्यांनी सांगितले.

अतिक्रमण विभागाला त्यांनी निर्देश दिले की, अवैध विक्री ठिकाणांवरील फुलवाल्यांना स्थलांतरित करण्याची कार्यवाही तातडीने करावी. यामुळे परिसर अधिक स्वच्छ, सुबक आणि व्यवस्थित होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

आयुक्तांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन सदस्यांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, या परिसरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा वापर बायोगॅस आणि सेंद्रिय खत निर्मितीसाठी करता येऊ शकतो. या उपक्रमासाठी महानगरपालिका आवश्यक सहकार्य करेल, तसेच बाजार समितीने कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या पाहणीदरम्यान वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे, उपअभियंता प्रमोद इंगोले, दिनेश हंबर्डे, जेष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय बुरे, स्वास्थ्य निरीक्षक प्रशांत गावनेर, धनिराम कलोसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

अमरावती महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे कॉटन मार्केट परिसरात स्वच्छता, शिस्त आणि सुबकता वाढून नागरिकांना स्वच्छ आणि सुसंवादी वातावरण लाभणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top