अमरावती महानगरपालिकेतर्फे स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेला गती देण्यात आली आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली १६ आणि १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सक्करसाथ आणि सराफा परिसरात मोठ्या प्रमाणावर जप्ती मोहीम राबविण्यात आली.
मनपाच्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी पथकाने सायंकाळपासून उशिरापर्यंत चालविलेल्या या मोहिमेत दोन मोठी गोडाऊन सील करण्यात आली तसेच २१५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक आणि तब्बल तीन ट्रक माल जप्त करण्यात आला. या जप्त सामग्रीमध्ये प्लास्टिक पिशव्या, कप, प्लेट्स, थर्माकोल वस्तू, कंटेनर आणि डिस्पोजेबल सामग्रीचा मोठा साठा आढळून आला. सर्व जप्त सामग्रीची नोंद घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ही मोहीम अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या उपस्थितीत अत्यंत नियोजनबद्ध व प्रभावीपणे पार पडली. त्या म्हणाल्या, “महानगरपालिकेकडून प्लास्टिक बंदीबाबत सातत्याने जनजागृती केली जात असतानाही काही व्यापारी नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा व्यापाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई होणार आहे. हा उपक्रम केवळ नियमभंग थांबविण्यासाठी नव्हे, तर पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक आहे.”
शिल्पा नाईक यांनी पुढे सांगितले की, “अमरावती स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. प्लास्टिक बंदी ही भविष्यातील पिढ्यांसाठी घेतलेले महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांनी कापडी व पेपरच्या पिशव्यांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे.”
मनपाने नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर तात्काळ थांबवावा आणि स्वच्छ, हरित अमरावतीसाठी प्रशासनास सहकार्य करावे.
या विशेष कारवाईत अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे, पथक प्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक श्र्वेता बोके, स्वास्थ्य निरीक्षक सय्यद हक, तसेच अतिक्रमण विभाग व मनपा कर्मचारी उपस्थित होते.











