“Reduce–Reuse–Recycle (RRR)” संकल्पनेतून ‘आनंदाची भिंत’ उपक्रम — आशादिप फाउंडेशनकडून संकलित साहित्याचे महानगरपालिकेला सुपूर्तीकऱण

अमरावती, दि. १ नोव्हेंबर २०२५ — पर्यावरण संवर्धन, पुनर्वापर आणि समाजहित या उद्देशाने “Reduce–Reuse–Recycle (RRR)” संकल्पनेवर आधारित ‘आनंदाची भिंत’ हा सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आशादिप फाउंडेशनकडून संकलित साहित्याचे सुपूर्तीकऱण आज अमरावती महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान (SBM) RRR सेंटर, अंबिका नगर येथे पार पडले.

या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून आशादिप फाउंडेशनकडून नागरिकांनी दान केलेल्या साहित्याचे अधिकृतरित्या हस्तांतर स्वीकारले. यावेळी स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक, IEC टीमचे प्रतिनिधी, आशादिप फाउंडेशनचे संस्थापक आनंद दरणे आणि स्वयंसेवक उपस्थित होते.

या उपक्रमाचे औचित्य २२ ऑक्टोबर २०२५ रोजी स्वामी विवेकानंद थीम पार्क, अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या “RRR कलेक्शन ड्राइव्ह” अंतर्गत पार पडले होते. या ड्राइव्हमध्ये नागरिकांनी स्वच्छ व वापरण्यायोग्य कपडे, शालेय साहित्य (पुस्तके, वह्या, बॅग्स, स्टेशनरी), खेळणी, घरगुती वस्तू व इलेक्ट्रॉनिक साहित्य मोठ्या प्रमाणात दान केले.

संकलित साहित्य आज अमरावती महानगरपालिका SBM RRR सेंटरकडे सुपूर्त करण्यात आले असून, तेथून या वस्तू गरजू नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या वेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी आशादिप फाउंडेशनच्या समाजहिताच्या प्रयत्नांचे कौतुक करून टीमला शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, “या उपक्रमामुळे समाजात पुनर्वापर, दानशीलता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक जनजागृती झाली आहे. नागरिकांनीही अशा उपक्रमात उत्साहाने सहभाग घ्यावा आणि वापरण्यायोग्य वस्तू थेट मनपा SBM RRR सेंटर, अंबिका नगर येथे जमा कराव्यात.”

महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी सांगितले की, “अमरावती महानगरपालिका शहरात पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे. नागरिकांनी प्लास्टिक वापर कमी करून पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर वाढवावा. ‘आनंदाची भिंत’ हे समाजातील परस्पर सहकार्याचे सुंदर उदाहरण आहे — प्रत्येक नागरिकाने आपली छोटीशी मदत मोठ्या बदलाचे कारण ठरवावी.”

त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की, “स्वच्छ आणि पुनर्वापरक्षम अमरावतीसाठी योगदान द्या. वापरण्यायोग्य कपडे, पुस्तके, खेळणी, भांडी, घरगुती वस्तू व इलेक्ट्रॉनिक साहित्य मनपा SBM RRR सेंटर, अंबिका नगर येथे नियमितपणे जमा करा.”

सदर कार्यक्रमाचे संयोजन आशादिप फाउंडेशन टीम व मनपा SBM IEC टीम यांच्या संयुक्त समन्वयातून पार पडले.
हा उपक्रम अमरावतीत दानशीलता, पर्यावरणपूरकता आणि जबाबदार नागरी सहभाग यांचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top