अमरावती शहराला मिळणार ‘सिटी बर्ड’! महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची घोषणा

अमरावती, दि. १ नोव्हेंबर २०२५: “माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत वन्यजीव व पर्यावरण संवर्धनासाठी अमरावती महानगरपालिकेकडून एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लवकरच अमरावती शहराचा ‘सिटी बर्ड’ निवडण्यात येणार असून, यासाठी महानगरपालिकेने वाइल्डलाईफ एन्व्हायर्नमेंट कन्झर्वेशन सोसायटी (WECS) सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे.

या उपक्रमाची घोषणा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक (IAS) यांनी ३८व्या महाराष्ट्र पक्षीप्रेमी परिषद व तिसऱ्या अखिल भारतीय पक्षिमित्र संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात केली. हे संमेलन अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात १ आणि २ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

आयुक्त सौम्या शर्मा चांडक म्हणाल्या, “अमरावती शहराच्या ओळखीशी सुसंगत असा एक पक्षी निवडून त्याला ‘सिटी बर्ड’ म्हणून घोषित केले जाणार आहे. या निवडीसाठी नागरिकांनाही सहभाग घेता यावा म्हणून ‘पक्षी मित्र निवडणुकी’चे आयोजन केले जाणार आहे.”

या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये पक्षीसंवर्धन, जैवविविधता आणि पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे हा आहे. शहराच्या पर्यावरणपूरक प्रतिमेला नवा आयाम मिळवून देणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असून, अमरावतीकरांना मतदानाद्वारे आपल्या ‘सिटी बर्ड’ची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संमेलनादरम्यान आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी संभाव्य “सिटी बर्ड” उमेदवारांची यादीही जाहीर केली. पक्षीप्रेमींमध्ये या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, अमरावती शहर लवकरच आपल्या खास ‘सिटी बर्ड’सह राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण करणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top