अमरावती महानगरपालिकेतर्फे फोटोग्राफी स्पर्धा २०२५ विजेत्यांची घोषणा

अमरावती महानगरपालिका आणि विधिमंत्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “फोटोग्राफी स्पर्धा २०२५” मधील पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री. शंतनु पाटील, द्वितीय क्रमांक श्री. भूषण अळसपुरे आणि तृतीय क्रमांक श्री. संदीप चौधरी यांना प्राप्त झाला आहे. तसेच प्रोत्साहनपर पारितोषिके श्री. सुशांत पांडे आणि श्री. मनीष मु-हेकर यांना प्रदान करण्यात आली आहेत. विजेत्यांना अनुक्रमे ₹११,०००, ₹७,०००, ₹५,००० तसेच ₹३,००० व ₹२,००० इतकी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

ही स्पर्धा २ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पार पडली. तसेच, स्पर्धेत सहभागी छायाचित्रांचे प्रदर्शन १६ ते २१ ऑक्टोबर दरम्यान संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे आयोजित करण्यात आले होते.

या उपक्रमाचा उद्देश अमरावती शहराचे सांस्कृतिक, सामाजिक आणि नैसर्गिक सौंदर्य छायाचित्रांच्या माध्यमातून सादर करणे हा होता. सहभागी छायाचित्रकारांनी ‘गणेश उत्सवातील अमरावती’, ‘शहरी व सांस्कृतिक सौंदर्य’, तसेच ‘निसर्ग व वन्यजीव – अमरावती परिसर’ या विषयांवर आकर्षक छायाचित्रे सादर केली.

स्पर्धेच्या परीक्षण समितीत श्री. उदय खोत, श्री. अद्वैत केवले आणि श्री. विकास केमदेव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी छायाचित्रांची निवड करताना कलात्मकता, विषयाची मांडणी आणि अभिव्यक्तीचा सौंदर्यदृष्टीने विचार केला.

महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्‍या शर्मा चांडक यांनी सांगितले की, “फोटोग्राफी स्पर्धा २०२५ हा उपक्रम शहरातील कलात्मक वातावरण अधिक समृद्ध करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अशा उपक्रमांमुळे स्थानिक छायाचित्रकारांना प्रोत्साहन मिळून त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते.”

आयुक्तांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व छायाचित्रकारांचे आभार मानले. या उपक्रमामुळे शहरातील नवोदित छायाचित्रकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली असून, अमरावतीच्या छायाचित्रकलेला नवसंजीवनी देणारी ही स्पर्धा ठरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top