आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी सुकळी कंपोस्ट डेपो व शवदाहिनीची पाहणी — ‘स्वच्छ अमरावती’साठी कामे गतीमान करण्याचे निर्देश

दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी सुकळी येथील कंपोस्ट डेपो तसेच मृत जनावरांसाठी प्रस्तावित शवदाहिनी प्रकल्प स्थळाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी स्वच्छता, कचरा प्रक्रिया आणि कंपोस्ट निर्मितीची सद्यस्थिती तपासून संबंधित अधिकाऱ्यांना कामे गतीमान करण्याचे निर्देश दिले.

आयुक्तांनी कंपोस्ट डेपोतील सेंद्रिय कचरा प्रक्रिया, वर्गीकरण यंत्रणा आणि स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेतला. डेपो परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ठेवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच यंत्रसामग्री नियमितपणे कार्यरत ठेवणे, कंपोस्ट निर्मिती क्षमता वाढविणे आणि आरोग्यविषयक उपाय काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी शवदाहिनी प्रकल्प स्थळाची पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. शहरातील आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करत, त्यांनी हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

या पाहणीदरम्यान अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्पा नाईक, शहर अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, पशुशल्य चिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे, अभियंता राजेश आगरकर, कंत्राटदार प्रतिनिधी तसेच महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्तांनी पाहणीदरम्यान कंपोस्ट डेपोतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शहर अभियंता रविंद्र पवार यांनी डेपो आणि शवदाहिनीतील कामकाजाची माहिती दिली, तर वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव यांनी स्वच्छतेच्या आरोग्यविषयक बाबींचा आढावा सादर केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top