अमरावती महानगरपालिकेतर्फे रविवारी शहरात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर ‘हॅप्पी स्ट्रीट’ या नव्या उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा पहिला टप्पा रविवारी सकाळी सहाला वेलकम पॉईंट येथे सुरू झाला.
शहरातील नागरिकांना वाहनमुक्त, प्रदूषणमुक्त आणि आनंददायी वातावरणात सकाळचा ताजेपणा अनुभवता यावा, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत सकाळच्या वेळेत रस्ते फक्त पायदळ, धावपटू आणि सायकलस्वारांसाठी खुले ठेवण्यात आले. नागरिकांसाठी योग, झुंबा, स्केटिंग, रनिंग, दोरी उड्या, पारंपरिक खेळ, कलात्मक उपक्रम, संगीत, फिटनेस प्रशिक्षण अशा विविध आरोग्यवर्धक आणि मनोरंजक क्रियाकलापांची रेलचेल होती. कुटुंबांसह आलेल्या नागरिकांनी उत्साहात सहभाग घेत परिसराला खऱ्या अर्थाने ‘हॅप्पी स्ट्रीट’चे रूप दिले.
अमरावतीत आरोग्यदायी जीवनशैली, सकारात्मकता आणि सभ्य वाहतूक संस्कृती रुजवण्यासाठी ‘हॅप्पी स्ट्रीट’ उपक्रम प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने महानगरपालिकेच्या अभिनव कल्पनेबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.
कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश कडू, उपअभियंता सुहास चव्हाण, उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, माजी नगरसेविका सुरेखा लुंगारे, जयंत कौलगीकर, संजय तिरथकर, ॲड. प्रशांत देशपांडे, डॉक्टर श्याम राठी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ, कविता शेंडे, यांच्या झुंबा ग्रुप, जयंत कौलगीकर, अपूर्व दाखोडे,शितल दाखोडे, निवेदिता कौलगीकर आणि सहकारी यांच्यासह राज डान्स फिटनेस स्टुडिओचे प्रशिक्षक झिन विजयालक्ष्मी व झिन मोनी, झिरो स्नुझ क्लब, महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत सुरू झालेला हा उपक्रम लवकरच शहराच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.











