नागरिकांच्या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पार्वती नगर क्रमांक ३, म्हाडा परिसराला भेट देऊन तेथील नाले, ड्रेनेज व्यवस्था आणि परिसरातील स्वच्छतेची सविस्तर पाहणी केली.
गेल्या काही दिवसांपासून पार्वती नगर परिसरातील नाल्यांमध्ये साचलेला कचरा, पाण्याचा ठिकठिकाणी झालेला अडथळा तसेच स्वच्छतेच्या अभावाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. या तक्रारींची दखल घेत आयुक्तांनी स्वतः स्थळी जाऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी नाल्यातील कचरा साफसफाईची कार्यक्षमता तपासली, ड्रेनेज लाईनमधील अडथळे दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि घनकचरा व्यवस्थापनाची स्थितीही आयुक्तांनी बारकाईने तपासली. त्यांनी ठिकठिकाणी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश दिले.
यावेळी महानगरपालिकेचे अभियंते, स्वच्छता निरीक्षक आणि स्थानिक कर्मचारी आयुक्तांसोबत उपस्थित होते. आयुक्तांनी परिसरातील नागरिकांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांनी नाले नियमितपणे साफ न केल्याची तक्रार मांडली. यावर आयुक्तांनी प्रत्येक नाल्याची नियमित स्वच्छता आणि मॉनिटरिंगसाठी स्वतंत्र पथके तयार करण्याचे निर्देश दिले.
आयुक्तांच्या अचानक पाहणीमुळे स्थानिक प्रशासनातही हलचल निर्माण झाली असून, संबंधित विभागांनी तत्काळ स्वच्छतेची मोहीम सुरू केली आहे. पाहणीनंतर आयुक्तांनी सांगितले की, “नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. पार्वती नगरसह संपूर्ण शहरात स्वच्छतेसंदर्भातील कारवाई अधिक प्रभावीपणे राबवली जाईल.”




