२३ नोव्हेंबर २०२५ — अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या हॅपी स्ट्रीट्स अमरावती उपक्रमाला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि ऊर्जा भरलेला प्रतिसाद मिळाला.
‘Sunday बनवा Funday’ या संकल्पनेला प्रतिसाद देत नागरिकांनी सकाळी ६ वाजताच वाहनमुक्त रस्त्यांवर मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि फिटनेस, मनोरंजन व सामाजिक जागरूकतेचा सुंदर संगम अनुभवला.
सकाळभर रनिंग, योगा, एरोबिक्स आणि विविध फिटनेस क्रियाकलापांनी वातावरण उत्साही बनले. प्रशिक्षक कविता शेंडे यांच्या नेतृत्वाखालील झुंबा सत्रांमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. परिसरात मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी असलेल्या मनोरंजन आणि खेळांच्या उपक्रमांमुळे आनंददायी आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
शिवाजी आयडियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थीनींनी स्वच्छता जनजागृती आणि मर्दानी आत्मरक्षा प्रात्यक्षिकांद्वारे प्रभावी संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने सजलेल्या या सादरीकरणाला नागरिकांनी भरभरून दाद दिली आणि शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हॅपी स्ट्रीट्सचा उद्देश नागरिकांमध्ये आरोग्य, फिटनेस, स्वच्छता आणि सामुदायिक सहभाग यांना प्रोत्साहन देणे हा आहे. फिट इंडिया मोहिमेच्या भावनेतून तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले, तर स्वच्छ सर्वेक्षण २०२५च्या पार्श्वभूमीवर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक अमरावतीचा संदेश दिला गेला.
मोर्शी रोडवरील रविवार सकाळ पूर्णपणे कुटुंबप्रधान आणि उत्सवमय वातावरणाने उजळली होती. पालक, मुले, युवक आणि ज्येष्ठ नागरिक—सर्वांनी मिळून सायकलिंग, चालणे, नृत्य, खेळ व विविध उपक्रमांचा आनंद घेतला. अनेक कुटुंबांनी सांगितले की अशा उपक्रमांनी ताणतणाव कमी होतो आणि सकारात्मक, आनंदी जीवनशैलीला चालना मिळते.
नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महानगरपालिका हा उपक्रम नियमित करण्याचा विचार करत आहे. अनेक नागरिकांनी “हॅपी स्ट्रीट्स ही केवळ एक सकाळ नाही, तर सकारात्मक सामाजिक चळवळ आहे,” असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला श्यामसुंदर देव, दत्तात्रय फिसके, सुरेखा लुंगारे, रश्मी नावंदर, कविता शेंडे व त्यांचा झुंबा ग्रुप, अक्षय गावंडे, अपूर्व डाखोडे, शितल डाखोडे, निवेदिता कौलगीकर, सुप्रसिद्ध गायक राहुल तायडे, इतर कलाकार तसेच महानगरपालिकेचे अधिकारी–कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॅपी स्ट्रीट्स अमरावतीमुळे शहरात आरोग्य, सकारात्मकता आणि सामाजिक एकतेचे नवे पर्व सुरू होत असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले.






