अमरावती महानगरपालिकेतील वाहतूक व्यवस्थापन सुधारणा, नागरिकांची सुरक्षितता आणि महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी आज आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक आढावा बैठक घेण्यात आली.
आयुक्त कक्षालगतच्या सभागृहात घेतलेल्या या बैठकीत प्रलंबित कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित विभागांना निश्चित वेळेत कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
प्रमुख प्रकल्पांचा आढावा
१) राजापेठ अंडरपास – वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित कामे, अतिरिक्त ड्रेनेज, प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षा दुरुस्त्या तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश.
२) राजकमल चौक उड्डाणपूल – वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डिझाईन व तांत्रिक बाबींना प्राधान्य देत अंमलबजावणीचा वेग वाढवण्याचे निर्देश.
३) गोपाल नगर अंडरपास – रेल्वे विभागाशी समन्वय, पाणी साचण्याची समस्या आणि मार्ग बदल याबाबत तातडीचे उपाय ठरविण्यात आले.
४) गोपाल नगर पादचारी पूल (एफ.ओ.बी.) – विद्यार्थ्य व पादचारींच्या सुरक्षिततेसाठी कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश.
आयुक्तांनी विभागांमध्ये प्रभावी समन्वय, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत काम पूर्ण करण्यावर भर दिला. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल अशा नियोजनावर विशेष लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीमुळे शहरातील वाहतूक सुधारणा आणि पायाभूत प्रकल्पांना गती मिळणार असून आगामी महिन्यांत प्रकल्पांमध्ये लक्षवेधी प्रगती दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


