अमरावती महानगरपालिका समाज विकास विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समता सप्ताह निमित्त आयोजित “दिव्यांग आनंद महोत्सव” अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात पार पडला. महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. १३, चपराशीपुरा येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, तर महेश देशमुख, नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, डॉ. प्रकाश मेश्राम आणि धनंजय शिंदे यांसह मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष ऊर्जाभर दिली.
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला असून त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरक यशकथांनी उपस्थितांना प्रोत्साहित केले.
यावेळी आयुक्तांनी दिव्यांग बांधव समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असल्याचे सांगत त्यांना समान संधी, शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मनोगताने कार्यक्रमाला प्रेरणादायी स्वर प्राप्त झाला.
समता सप्ताहाचा संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी निघालेल्या जनजागृती रॅलीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “समान संधी हा प्रत्येकाचा हक्क” आणि “दिव्यांग सक्षमीकरण – समाजाची जबाबदारी” असे संदेश देत रॅलीने शहरात सकारात्मक वातावरण निर्माण केले.
महोत्सवात नृत्य, गीत, नाटिका, चित्रकला आणि विशेष क्रीडा उपक्रमांसह विविध कार्यक्रमांनी मुलांना त्यांच्या प्रतिभा सादर करण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले.
दिव्यांग सक्षमीकरण आणि समावेशकतेसाठी अमरावती महानगरपालिकेने राबविलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत असून, समता सप्ताहाच्या निमित्ताने “दिव्यांग आनंद महोत्सवा”ने समाजात समान संधी, सन्मान आणि आदराच्या मूल्यांचा संदेश प्रभावीपणे रुजवला. आगामी काळात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अधिक सुविधा, उपक्रम आणि संधी निर्माण करण्यासाठी महानगरपालिका सातत्याने पुढाकार घेत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





