महानगरपालिका निवडणूक तयारीचा सखोल आढावा; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक

अमरावती महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची तयारी, नियोजन व अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये आढावा बैठक पार पडली.

महानगरपालिकेसाठी मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार असून ही निवडणूक २२ प्रभागांतील ८७ जागांसाठी होत आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रत्येक प्रभागात चार जागा असून प्रभाग क्रमांक ९ मध्ये तीन जागा आहेत.

एकूण मतदारसंख्या ६,७७,१८० असून त्यात पुरुष ३,३९,१७७, महिला ३,३७,९३५ व इतर ६८ मतदारांचा समावेश आहे. महिलांसाठी ४४, अनुसूचित जातीसाठी १५, अनुसूचित जमातीसाठी २ व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी २३ जागा आरक्षित असून उमेदवारांसाठी खर्च मर्यादा ९ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार असून मतदानासाठी ईव्हीएम वापरण्यात येणार आहेत. नामनिर्देशन प्रक्रिया २३ ते ३० डिसेंबर २०२५, छाननी ३१ डिसेंबर २०२५, उमेदवारी माघार २ जानेवारी २०२६, चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी ३ जानेवारी २०२६, मतदान १५ जानेवारी २०२६ व मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निर्णय अधिकारी व सहाय्यक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून आवश्यक मनुष्यबळ, आचारसंहिता कक्ष, झोननिहाय दक्षता समित्या तसेच माध्यम प्रमाणन व निरीक्षण समिती कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी व्यापक मतदार जनजागृती मोहिमा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला व लहान बाळासह महिलांसाठी विशेष सुविधा तसेच काही ठिकाणी पिंक मतदान केंद्रे उभारण्यावर भर देण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे ‘मताधिकार’ मोबाईल अॅप (Google Play Store) तसेच mahaseevoterlist.in या संकेतस्थळावरून मतदारांना आपले नाव, मतदान केंद्र व उमेदवारांची माहिती उपलब्ध होणार आहे. बैठकीत झोननिहाय व्यवस्थापन, मतदान केंद्रांची निश्चिती, निवडणूक साहित्याचे नियोजन, सुरक्षा व वाहतूक व्यवस्था तसेच आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भीड व सुरळीत पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश देत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे आयुक्तांनी नमूद केले.

या आढावा बैठकीस उपायुक्त, निवडणूक अधिकारी, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top