आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ रोजी नवसारी स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे उभारण्यात आलेल्या मतमोजणी स्थळाची सखोल पाहणी केली.
या वेळी आयुक्तांनी मतमोजणीसाठी तयार करण्यात आलेल्या सर्व कक्षांची प्रत्यक्ष तपासणी करत टेबलांची मांडणी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी बसण्याची व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींसाठी राखीव कक्ष तसेच मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध मूलभूत सुविधांचा आढावा घेतला.
मतमोजणीदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व तयारी काटेकोरपणे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर देत सीसीटीव्ही यंत्रणा, प्रवेश-निर्गमन मार्ग, पोलीस बंदोबस्त व ओळखपत्र तपासणी यंत्रणेची तपासणी करण्यात आली. मतमोजणी प्रक्रियेची गोपनीयता व सुरक्षितता अबाधित राहील याची खात्री करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
तसेच अखंड वीजपुरवठा, जनरेटर व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, वैद्यकीय सुविधा व आपत्कालीन उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.
यावेळी स्ट्रॉंगरूम, ऑब्झर्व्हर रूम, पार्किंग व्यवस्था, पोलीस नियंत्रण कक्ष तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेची पाहणी करत सर्व बाबींमध्ये शिस्तबद्ध व सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
मतमोजणीच्या दिवशी अधिकारी, कर्मचारी, उमेदवारांचे प्रतिनिधी व माध्यम प्रतिनिधी यांच्यात समन्वय राखणे अत्यावश्यक असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्वनियोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पाहणीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, निवडणूक विभागाचे अधिकारी, विविध विभागप्रमुख व संबंधित कर्मचारी उपस्थित होते. मतमोजणी प्रक्रिया शांततेत, पारदर्शकतेने व नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.






