शहर स्वच्छ, सुंदर व अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी शहरातील प्रमुख भागांची सविस्तर पाहणी केली.
या पाहणीदरम्यान जयस्तंभ चौक ते जुना कॉटन मार्केट, चौधरी चौक, विलास नगर तसेच गाडगेनगर परिसराचा आयुक्तांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.
पाहणीदरम्यान शहरातील साफसफाईची सद्यस्थिती, रस्त्यांची अवस्था, सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा तसेच वाहतूक व नागरिकांच्या दैनंदिन वर्दळीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
काही ठिकाणी साफसफाईची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देत स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
विशेषतः गाडगेनगर परिसरात उभे असलेले कंटेनर तात्काळ हटविण्याचे आदेश आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिले.
या कंटेनरमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून परिसरातील नागरिकांना गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच पाहणीदरम्यान शहरातील विविध भागांत अतिक्रमणाची समस्या गंभीर असल्याचे आढळून आले. यावर कठोर भूमिका घेत आयुक्तांनी संबंधित विभागांना कोठेही अतिक्रमण आढळून आल्यास त्वरित व प्रभावी कारवाई करून अतिक्रमण हटविण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
अतिक्रमणामुळे शहराचे सौंदर्य व शिस्त बाधित होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी आयुक्तांनी नागरिकांना स्वच्छतेबाबत जाणीवपूर्वक सहभाग घेण्याचे आवाहन केले.
“शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ महानगरपालिकेचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा, तसेच अतिक्रमणास प्रोत्साहन देऊ नये.
स्वच्छ व शिस्तबद्ध शहरासाठी प्रशासनास सहकार्य करावे,” असे आवाहन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नागरिकांना केले.
शहर स्वच्छता, सुयोग्य नियोजन व अतिक्रमणमुक्त वातावरण राखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून यापुढेही अशा प्रकारच्या नियमित पाहण्या व कठोर कारवाया करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पाहणीमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक मजबूत होणार असून अतिक्रमणावर नियंत्रण मिळविण्यास प्रशासनाला बळ मिळणार असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या पाहणीदरम्यान वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, स्वच्छता अधिक्षक विजय बुरे, ज्येष्ठ स्वच्छता निरीक्षक राजू डिक्याव, श्रीकांत डवरे, स्वच्छता निरीक्षक तसेच मनपा कर्मचारी उपस्थित होते.







