दि. १६ डिसेंबर २०२५ : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी महानगरपालिका उत्तर झोन क्र. १ कार्यालयाची सखोल पाहणी केली.
निवडणूक प्रक्रिया सुचारू, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या तयारीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निवडणूक नियोजनाशी संबंधित विविध बाबींवर अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली.
मतदान केंद्रांची निवड, त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या मूलभूत सुविधा, मतदारांसाठी करण्यात येणाऱ्या सोयी, मतदान यंत्रांची सुरक्षितता, मनुष्यबळाचे योग्य नियोजन तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपाययोजना करण्याच्या आराखड्याबाबत त्यांनी माहिती घेतली. निवडणूक कामकाजात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व विभागांनी वेळेत व परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी मतदार याद्यांची अचूकता, निवडणूक साहित्याचे वितरण व साठवणूक, तसेच सुरक्षा यंत्रणेसोबत असणारा समन्वय यावर विशेष भर दिला.
निवडणुकीच्या कालावधीत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्त चांडक यांनी दिल्या. तसेच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व महिला मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
उत्तर झोन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निवडणूक कामकाज ही प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असून त्यामध्ये निष्पक्षता, पारदर्शकता व वेळेचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
या पाहणीमुळे निवडणूक तयारीला अधिक गती मिळणार असून प्रशासन सज्ज असल्याचा सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. आगामी निवडणुका सुरळीत व शांततेत पार पडाव्यात, यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.





