आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज, मंगळवार दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी शहरातील निवडणूक नियोजनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
याअंतर्गत त्यांनी महानगरपालिकेच्या विविध झोन कार्यालयांसह महत्त्वाच्या विभागांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीमध्ये मध्यम झोन क्र.२, पूर्व झोन क्र.३, पश्चिम झोन क्र.५, शिक्षण विभाग तसेच जुने तहसील कार्यालय यांचा समावेश होता. प्रत्येक ठिकाणी आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तयारीची माहिती घेतली.
मतदान केंद्रांची रचना, मतदानासाठी आवश्यक भौतिक सुविधा, मनुष्यबळाचे नियोजन, मतदार याद्यांची अद्ययावत स्थिती तसेच सुरक्षा व प्रशासकीय व्यवस्थेचा त्यांनी सखोल आढावा घेतला.
पाहणीदरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध व सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.
कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने व वेळेत काम पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. निवडणूक काळात नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शिक्षण विभाग व जुने तहसील कार्यालयाच्या पाहणीदरम्यान निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या खोल्या, साहित्य साठवणूक, अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच दळणवळण व संपर्क व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आवश्यक ठिकाणी सुधारणा करण्याच्या सूचना देत आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.















