आगामी मतमोजणी प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व सुरळीतपणे पार पडावी, या अनुषंगाने अमरावतीचे पोलिस आयुक्त राकेश ओला व महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज, १७ डिसेंबर २०२५ रोजी शहरातील प्रमुख मतगणना केंद्रांची पाहणी केली.
या पाहणीमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सांस्कृतिक भवन तसेच निवडणूक निर्णय अधिकारी (क्र. २) यांचे नवीन तहसील कार्यालय यांचा समावेश होता. दोन्ही आयुक्तांनी मतगणना केंद्रांवरील पायाभूत सुविधा, प्रवेश–निर्गमन व्यवस्था, उमेदवार व माध्यम प्रतिनिधींसाठीची मांडणी तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांची व्यवस्था तपासली.
पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, अतिरिक्त पोलिस फौजफाटा व त्वरित प्रतिसाद पथकांच्या तैनातीचे निर्देश दिले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी वीज, पाणी, स्वच्छता, अग्निसुरक्षा, वैद्यकीय मदत व आपत्कालीन व्यवस्थेची तयारी पूर्ण ठेवण्याच्या सूचना दिल्या.
मतगणना प्रक्रियेत सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या पाहणीदरम्यान निवडणूक विभाग, पोलिस व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाकडून मतगणनेसाठी सर्व तयारी पूर्ण असून नागरिकांनी शांतता व सहकार्य राखावे, असे आवाहन करण्यात आले.







