आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज (१८ डिसेंबर २०२५) सायंकाळी ७ वाजता बडनेरा झोन कार्यालयाची सविस्तर पाहणी केली.
निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पडावी, यासाठी सुरू असलेल्या तयारीचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.
यावेळी बडनेरा प्रभागातील सर्व मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश देत आयुक्तांनी मतदारांसाठी मूलभूत सुविधांवर भर दिला.
स्वच्छता, पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, रॅम्प, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर आखणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पूर्वनियोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत मतदान केंद्रांची यादी, मनुष्यबळ नियोजन, वाहतूक व्यवस्था, साहित्य उपलब्धता व आपत्कालीन सज्जता याबाबत सर्व विभागांनी वेळेत जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात, असे निर्देश देण्यात आले.
प्रशासन, पोलीस व संबंधित विभागांमध्ये समन्वय राखून नागरिकांचा विश्वास टिकवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या पाहणीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती निकिता जावरकर, सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे, सहाय्यक अभियंता श्रीरंग तायडे तसेच सहाय्यक आयुक्त व जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर यांच्यासह बडनेरा झोनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या तयारीला गती मिळाल्याने निवडणुका यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





