अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : एफएसटी, व्हीएसटी व एसएसटीसाठी सविस्तर प्रशिक्षण संपन्न

दि. १८ डिसेंबर २०२५ | अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ पारदर्शक, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, या उद्देशाने एफएसटी (फ्लाइंग स्क्वॉड टीम), व्हीएसटी (व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम) व एसएसटी (स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम) यांच्या रचना, कार्यपद्धती व जबाबदाऱ्यांवर सविस्तर प्रशिक्षण कार्यक्रम आज सायंकाळी आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडला.

प्रशिक्षण सत्रात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, तक्रारींची तत्काळ दखल, घटनास्थळी तपासणी व वेळेत अहवाल सादरीकरण या बाबींवर भर देण्यात आला.

आचारसंहिता कक्ष प्रमुख राम लंके यांनी एफएसटीच्या कार्यपद्धतीचे सविस्तर मार्गदर्शन केले.

व्हीएसटीमार्फत प्रचारसभा, मिरवणुका व अन्य हालचालींचे व्हिडिओ चित्रीकरण, दस्तऐवजीकरण व पुराव्यांची सुरक्षितता याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

तसेच एसएसटीद्वारे ठराविक ठिकाणी स्थिर राहून संशयास्पद हालचाली, रोख रक्कम, भेटवस्तू व बेकायदेशीर प्रचार साहित्यावर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

आदर्श आचारसंहितेचा उद्देश निर्भय, मुक्त व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करणे असून शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग, भ्रष्ट आचरण व निवडणूक विषयक गुन्हे रोखणे यावर विशेष भर देण्यात आला.

प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे कार्यपद्धती समजावून सांगत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

आगामी अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ यशस्वी, विश्वासार्ह व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top