अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची अधिकृत घोषणा झाल्यानंतर १५ डिसेंबर २०२५ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारीला वेग देत निवडणूक अधिकाऱ्यांचे सविस्तर प्रशिक्षण आयोजित केले.
महानगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी (१, २, ३) तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आज (१८ डिसेंबर २०२५) सकाळी ११ वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, अमरावती महानगरपालिका येथे पार पडले.
हे प्रशिक्षण महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विवेक जाधव व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शिवाजी शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
निवडणूक प्रक्रियेतील कायदेशीर तरतुदी, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणूक कार्यक्रम, नामनिर्देशन व छाननी, प्रचार काळातील नियम, उमेदवारी मागे घेणे, चिन्ह वाटप, मतपत्रिका छपाई, मतदान यंत्र तयारी, मतदान कर्मचारी नियोजन, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी तसेच आचारसंहिता भंग झाल्यास करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी सर्व अधिकाऱ्यांनी निवडणूक काळात संवेदनशीलता, तत्परता व निष्पक्षता राखून काम करावे, असे निर्देश दिले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रशिक्षणामुळे अधिकाऱ्यांच्या शंका दूर होऊन आत्मविश्वास वाढेल तसेच आगामी अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे व उपायुक्त नरेंद्र वानखडे उपस्थित होते.





