महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन–राजकीय पक्ष समन्वय बळकट; आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष प्रतिनिधींंसोबत आढावा बैठक

अमरावती महानगरपालिका निवडणूक २०२५–२०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची तयारी, नियोजन व अंमलबजावणी यासंदर्भात, १९ डिसेंबर २०२५ रोजी, निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींंसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

बैठकीत आदर्श आचारसंहितेचे पालन, प्रचारासंबंधी नियम, निवडणूक खर्च मर्यादा तसेच शांततापूर्ण, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मार्गदर्शन करताना आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी स्पष्ट केले की, निवडणूक ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया असून तिचे संचालन कायदेशीर, निर्भय व पारदर्शक पद्धतीने करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

यासाठी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आपल्या सूचना व प्रश्न मांडले. त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी आवश्यक स्पष्टीकरण व माहिती दिली.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, कोणताही गैरप्रकार टाळणे आणि नागरिकांना निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, निवडणूक विभागाचे कर्मचारी तसेच विविध राष्ट्रीय व स्थानिक राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top