आगामी अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या स्वीप (SVEEP) विभागामार्फत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून नवमतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याच्या हेतूने श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय येथे मतदान शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा-चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात सुमारे ५०० विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली.
यावेळी मतदान का आवश्यक आहे, लोकशाहीमध्ये मतदाराची भूमिका आणि राष्ट्रीय विकासातील मतदानाचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवमतदारांमध्ये मतदानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमास स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज कुमार सपकाळ, प्रभारी प्राचार्य श्री. साबळे, शाळा निरीक्षक योगेश पखाले यांच्यासह कैलास कुलट, उज्वल जाधव, योगेश राणे, संजय बेलसरे, निजामउद्दीन काझी, शुभांगी सुने, सुषमा दुधे आणि सुमेश वानखडे उपस्थित होते.
नवमतदारांपर्यंत थेट पोहोचणाऱ्या या उपक्रमामुळे मतदानाबाबत जनजागृती वाढीस लागून शहरातील मतदान टक्केवारी वाढविण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


