सशक्त लोकशाहीसाठी ‘हॅपी स्ट्रीट्स अमरावती’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती उपक्रम यशस्वी

लोकशाही बळकटीकरण आणि मतदानाविषयी जनजागृती या उद्देशाने अमरावती महानगरपालिका व स्वीप (SVEEP) कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘हॅपी स्ट्रीट्स अमरावती’ हा उपक्रम रविवारी उत्साहात पार पडला.

“मी मतदान करणार आहे – माझा वोट, माझा भविष्य” आणि “लोकशाही माझा अभिमान – १००% मतदान” या संदेशांनी कार्यक्रमाला प्रभावी स्वरूप दिले.

मोर्शी रोड येथील वेलकम पॉईंटवर सकाळी ६ वाजल्यापासून सुरू झालेल्या उपक्रमात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच विविध सामाजिक संघटनांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला.

सहभागी नागरिकांनी मतदानाचे महत्त्व समजून घेत आगामी निवडणुकीत मतदान करण्याचा संकल्प व्यक्त केला.

झुंबा, क्रीडा व सामूहिक व्यायाम, मनोरंजनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून मतदानाचा संदेश सहज आणि परिणामकारक पद्धतीने पोहोचवण्यात आला. आरोग्य, आनंद आणि लोकशाही यांचा सुरेख संगम या उपक्रमात अनुभवायला मिळाला.

महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. “माझे मत – माझा अधिकार” हा संदेश त्यांनी ठामपणे मांडला, तर युवकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाचे आवाहन केले.

यावेळी मतदान नोंदणी, मतदान प्रक्रिया आणि राष्ट्रीय विकासातील मतदानाचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली.

या अभिनव उपक्रमामुळे शहरात १०० टक्के मतदानाच्या दिशेने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अमरावती महानगरपालिका व स्वीप समितीचे कौतुक होत असून, मतदार सहभाग वाढविण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top