सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत सुरू असलेल्या तयारीचा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सोमवार, २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सखोल आढावा घेतला.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्ण सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
या आढावा बैठकीत मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मनुष्यबळ नियोजन, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी यासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या तयारीचा तपशीलवार अहवाल आयुक्तांसमोर सादर केला.
२३ डिसेंबर २०२५ पासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होणार असून त्यासंदर्भातील संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यात आला. नामनिर्देशनपत्रे:
– २३ ते २९ डिसेंबर २०२५ दरम्यान सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत आणि
– ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहेत.
२५ डिसेंबर (गुरुवार) व २८ डिसेंबर (रविवार) या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. तसेच नामनिर्देशनपत्रांची छाननी, निवडणूक चिन्ह वाटप व मतमोजणी प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा असल्याचे नमूद करत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे व काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश दिले.
कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे कठोर पालन करण्याचे आदेश दिले.
मतदानाच्या दिवशी नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, स्वच्छता तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्व विभागांमध्ये समन्वय राखून नियमित आढावा बैठका घेतल्या जातील, असेही आयुक्तांनी सांगितले.
या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच विविध झोनचे उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, विविध खात्यांचे विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.




