सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्विप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमांतर्गत शिक्षण विभागाची सविस्तर आढावा बैठक मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली.
ही बैठक निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत शाळा व महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या स्विप उपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली. मतदार नोंदणी, मतदानाचे महत्त्व, लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविणे तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात मतदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचविण्यासाठी निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, प्रभात फेरी, मतदार शपथ कार्यक्रम यांसारखे उपक्रम अधिक परिणामकारकपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्विप उपक्रम हे केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्ष परिणामकारक ठरले पाहिजेत, असे स्पष्ट करत आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे नमूद केले.
प्रत्येक शाळा व महाविद्यालयाने नियोजनबद्ध पद्धतीने उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी शिक्षण विभागाने आतापर्यंत राबविलेल्या उपक्रमांचा अहवाल सादर केला. तसेच भविष्यातील कृती आराखडा, कालमर्यादा व जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सर्व उपक्रम वेळेत पूर्ण करून त्याचा अहवाल निवडणूक विभागाकडे सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ, महापालिकेचे कर्मचारी व संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



