सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भीड व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिकेत महानगरपालिकास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती (एमसीएमसी)ची सविस्तर बैठक मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली.
ही बैठक निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणीदरम्यान माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले.
इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या निवडणूकविषयक जाहिराती, बातम्या, प्रचार साहित्य व आशयाचे प्रमाणन आणि संनियंत्रण कसे करावे, यावर सखोल चर्चा झाली.
पेड न्यूज, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, तथ्यहीन माहिती तसेच मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या आशयावर काटेकोर नजर ठेवण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिल्या.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोणतीही राजकीय जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता फेसबुक, एक्स (ट्विटर), इन्स्टाग्राम, युट्यूब व अन्य डिजिटल माध्यमांवरील प्रचार, पोस्ट, व्हिडिओ व जाहिरातींच्या निरीक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा अधिक सक्रिय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी समितीने नियमित आढावा बैठका घेऊन त्वरित कारवाई करावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह राहण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी जबाबदारीने, वस्तुनिष्ठ व नियमपालन करत पत्रकारिता करावी, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, आचारसंहिता कक्ष प्रमुख राम लंके, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, अमरावती आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे, पोलीस निरीक्षक निलेश करे, तसेच समितीचे सदस्य व जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर उपस्थित होते.



