सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावतीत निवडणूक तयारीचा आढावा; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची EVM स्टोअर व प्रशिक्षण केंद्रांना भेट

आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी सांस्कृतिक भवन आणि आयटीआय कॉलेज येथे पाहणी दौरा केला.

यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांस्कृतिक भवन येथील ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) स्टोअरची सविस्तर पाहणी केली.

स्टोअरमधील यंत्रांची सुरक्षित साठवण, प्रवेश नियंत्रण व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, सीलिंग प्रक्रिया तसेच नियमित तपासणी यांचा त्यांनी आढावा घेतला.

मतदान प्रक्रियेत ईव्हीएमची सुरक्षितता व अचूकता अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करत, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

त्यानंतर आयुक्तांनी आयटीआय कॉलेज येथे होणाऱ्या निवडणूक प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. प्रशिक्षणासाठी उपलब्ध बैठक व्यवस्था, तांत्रिक सुविधा, प्रशिक्षण सत्रांची रूपरेषा तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योग्य व वेळेत प्रशिक्षण अत्यावश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सर्व संबंधित विभागांना निवडणूकपूर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देत, शहरातील प्रत्येक ईव्हीएम स्टोअर व प्रशिक्षण केंद्राची नियमित पाहणी केली जाईल, असे सांगितले.

यामुळे मतदान प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा सुरक्षित, पारदर्शक व विश्वासार्ह राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, उपअभियंता सुहास चव्हाण, अभियंता राजेश आगरकर, सुधीर गोटे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top