आगामी सार्वत्रिक निवडणूक 2025-26 पारदर्शक, निर्भय व लोकसहभागातून यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी आज, 30 डिसेंबर 2025 रोजी स्विप (SVEEP – Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमाचा आढावा घेतला. ही बैठक अमरावती महानगरपालिका मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे पार पडली.
यावेळी मतदार जनजागृती, मतदान टक्केवारी वाढविणे आणि लोकशाही प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे, हा स्विप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डिजिटल युगातील सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेता फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर), व्हॉट्सॲप व युट्यूब यांसारख्या माध्यमांचा योजनाबद्ध वापर करून मतदारांपर्यंत निवडणूकविषयक माहिती पोहोचविण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
विशेषतः प्रथमच मतदान करणारे तरुण, महिला, दिव्यांग तसेच शहरी भागातील व्यस्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल माध्यमे प्रभावी ठरतील, असे त्यांनी नमूद केले.
मतदार यादीतील नाव नोंदणी, दुरुस्ती, पत्ता बदल, मतदार ओळखपत्र तसेच मतदान प्रक्रियेची माहिती सोप्या व सुलभ भाषेत देण्यावर भर देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
पोस्टर्स, व्हिडीओ, संदेश व नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले.
स्विप कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी महानगरपालिकेचे विविध विभाग, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना व नागरिक यांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगून सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करण्याचे निर्देश आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी दिले.
या बैठकीस महानगरपालिकेतील विविध विभागांचे अधिकारी, निवडणूक शाखेतील कर्मचारी व स्विप कार्यक्रमाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.





