पथनाट्याच्या माध्यमातून नवमतदारांना मतदानाचा जागर — अमरावतीत लोकशाही उत्सवासाठी उत्स्फूर्त आवाहन

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने मनपाच्या वतीने नाविन्यपूर्ण जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मनपा आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप (SVEEP) विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत.

या उपक्रमांतर्गत यशोदा नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, उत्तम नगर येथे विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

नवमतदार विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांसाठी आयोजित या कार्यक्रमात मतदान का आवश्यक आहे, लोकशाहीत प्रत्येक मताचे महत्त्व आणि मतदान न केल्यास होणारे परिणाम यावर प्रभावी संदेश देण्यात आला.

दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्रीमती शिल्पा नाईक यांनी केले.

यावेळी उपस्थित नागरिक व नवमतदारांनी मतदानाची शपथ घेतली. मतदानाच्या दिवशी सुट्टी असली तरी मतदान करणे का आवश्यक आहे, याचे प्रात्यक्षिकही पथनाट्याद्वारे सादर करण्यात आले.

या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास स्वीप नियंत्रण अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर पायस, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ यांच्यासह कैलास कुलट, सुमेश वानखडे, संजय बेलसरे, निजामउद्दीन काझी, सुषमा दुधे, शुभांगी सुने, ज्योती बनसोड, शाळा निरीक्षक, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

अमरावती महानगरपालिका व स्वीप विभागाच्या या उपक्रमांमुळे मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top