नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकशाही बळकटीचा संकल्प — अमरावती महानगरपालिकेतर्फे नवमतदारांना मतदानाची शपथ

अमरावती महानगरपालिकेतर्फे नववर्षाच्या प्रारंभी लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गुरुवार, दि. ०१ जानेवारी २०२६ रोजी प्रॉ. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे नवमतदारांसाठी मतदान शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

१८ वर्षे पूर्ण करून प्रथमच मतदार म्हणून नोंदणी केलेल्या युवक-युवतींना यावेळी मतदानाची शपथ देण्यात आली. तरुणांचा मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढावा आणि लोकशाहीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. नवमतदारांना संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व स्पष्ट करताना, “मतदान हा केवळ हक्क नसून ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,” असा संदेश देण्यात आला.

निर्भय व विवेकपूर्ण मतदान करून सक्षम आणि जबाबदार लोकप्रतिनिधी निवडावेत, तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वच्छ लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमात मतदार नोंदणी प्रक्रिया, मतदान यंत्रांचा वापर, निवडणूक आयोगाची भूमिका आणि नागरिकांची संविधानिक कर्तव्ये याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदानाची शपथ घेत लोकशाही सुदृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त श्रीमती शिल्पा नाईक, स्वीप प्लॅन नोडल अधिकारी व शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, PRMITR बडनेरा (जुने मेघे कॉलेज) चे प्राचार्य डॉ. गजेंद्र बामणोटे, PRMCEAM बडनेरा (नवे महाविद्यालय) चे प्राचार्य डॉ. अजय ठाकरे, प्राध्यापक विजय काळे, डॉ. किरण डोंगरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकजकुमार सपकाळ, विशेष शिक्षक कैलास कुलट यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व मनपाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नववर्षाच्या सुरुवातीलाच राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे तरुण पिढीत मतदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन आगामी निवडणुकांमध्ये मतदार सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

अमरावती महानगरपालिका भविष्यातही अशा जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top