निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज — अमरावती मनपात आढावा बैठक

येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक यांनी शुक्रवार, दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांची ऑनलाईन आढावा बैठक मनपा कॉन्फरन्स हॉलमध्ये घेतली.

बैठकीत मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मनुष्यबळ नियोजन, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, निवडणूक साहित्याचे वितरण व संकलन, मतमोजणीची तयारी तसेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी या सर्व बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पाडावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिले.

कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीमती शिल्पा नाईक, उपायुक्त दादाराव डोलारकर, ऑनलाईन माध्यमातून सात झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख तसेच निवडणूक कामकाजाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या आढावा बैठकीमुळे अमरावती महानगरपालिकेतील निवडणूक तयारीला अधिक गती मिळाली असून, सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top