सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिकेमार्फत युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.
या अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक यांनी शुक्रवार, दि. 02 जानेवारी 2026 रोजी अमरावती येथील सांस्कृतिक भवनाजवळील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) साठवणूक व व्यवस्थापन केंद्राची सखोल पाहणी केली.
या ठिकाणी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांची सुरक्षित साठवणूक सुरू असून निवडणुकीपूर्वी प्रत्येक यंत्राची प्रथम स्तरीय तपासणी (FLC) प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, सुरक्षा कर्मचारी तैनाती, अग्निसुरक्षा उपाययोजना तसेच प्रवेश व निर्गमन नियंत्रण प्रणाली यांची सविस्तर माहिती घेतली.
निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा संवेदनशील असल्याने कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
ईव्हीएम गोदामाची नियमित तपासणी, २४ तास सीसीटीव्ही निरीक्षण आणि नोंदवही अद्ययावत ठेवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व विश्वासार्हता राखणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असून, सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाहणीदरम्यान निवडणूक शाखेचे अधिकारी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते. आढळलेल्या किरकोळ बाबी तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले.
आगामी सार्वत्रिक निवडणुका आदर्श आचारसंहितेचे पालन करून यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिका पूर्णतः सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.



