अमरावती शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, लॉन्स, केटरिंग व्यवसाय तसेच हॉस्पिटल, नर्सिंग होम व खाजगी दवाखान्यांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध व नियमबद्ध विल्हेवाट लावणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिले आहेत.
घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६, बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन नियम व स्वच्छ भारत अभियान (SBM) 2.0 अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
शहरातील अनेक आस्थापनांकडून मोठ्या प्रमाणात ओला-सुका कचरा व बायोमेडिकल वेस्ट निर्माण होत असून, काही ठिकाणी तो नियमबाह्य पद्धतीने टाकला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे सार्वजनिक स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत हॉटेल वेस्ट मॅनेजमेंट व बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट संदर्भात झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
हॉटेल व खाद्य आस्थापनांसाठी निर्देश :
* १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनी ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करून साठवणे बंधनकारक.
* मंगल कार्यालये व लॉन्समध्ये उरलेले चांगले अन्न सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना वितरित करण्याचे निर्देश.
* सर्व आस्थापनांनी कचरा केवळ मनपा नियुक्त कंत्राटदाराकडेच द्यावा; नियमभंगास दंडात्मक कारवाई.
बायोमेडिकल वेस्टसंदर्भातील निर्देश :
* सर्व हॉस्पिटल, नर्सिंग होम व दवाखान्यांनी महानगरपालिकेत नोंदणी करून बायोमेडिकल वेस्ट अधिकृत एजन्सीकडेच देणे अनिवार्य.
* सिरींज, इंजेक्शन, औषधी अवशेष आदी कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास कठोर कारवाई.
* बायोमेडिकल वेस्ट व्यतिरिक्त सुका कचरा मनपा नियुक्त घंटागाडीतच देणे बंधनकारक.
दरम्यान, आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी ५ जानेवारी २०२६ रोजी स्वच्छता विभागाच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला. कचरा संकलनात शिस्त, नियमित कर्मचारी नेमणूक, रात्रीची स्वच्छता, डस्टबिनचे योग्य नियोजन व कचरा वाहतुकीतील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवणे ही सामूहिक जबाबदारी असून, नागरिक व आस्थापनांनी ओला-सुका कचरा वेगळा करून देण्यासह सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.



