निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज सांस्कृतिक भवन परिसरातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) गोदामाची सखोल पाहणी केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ई.व्ही.एम. यंत्रांची साठवणूक, सुरक्षा व व्यवस्थापनाची पडताळणी करण्यासाठी ही पाहणी करण्यात आली.
यावेळी आयुक्तांनी ई.व्ही.एम. साठवणूक केंद्रातील कार्यपद्धती, नोंदणी प्रक्रिया, देखभाल व तांत्रिक तपासणीचा आढावा घेतला. गोदामातील सीसीटीव्ही व्यवस्था, प्रवेश नियंत्रण व कागदपत्रांची पडताळणी याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
ई.व्ही.एम. संदर्भातील सर्व कामकाज हे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक व काटेकोरपणे राबविण्यात यावे, तसेच कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा असून, ई.व्ही.एम. यंत्रांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका निवडणूक विभागानुसार आतापर्यंत 1200 कंट्रोल युनिट व 2400 बॅलेट युनिट प्राप्त झाले असून, संवेदनशील भागांसाठी मायक्रो ऑब्झर्वर नियुक्त करण्यात आले आहेत.
या पाहणीदरम्यान संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





