आगामी अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ची मतगणना प्रक्रिया पारदर्शक, नियमबद्ध व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचा पुनरुच्चार करत निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंगळवारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे उभारण्यात आलेल्या मतगणना केंद्राची सातही झोनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमवेत सखोल पाहणी केली.
पाहणीदरम्यान मतगणना केंद्रावरील भौतिक व्यवस्था, मतमोजणी टेबल्सची मांडणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश-निर्गमन मार्ग, CCTV यंत्रणा, विद्युत व अग्निसुरक्षा तसेच आपत्कालीन व्यवस्थांचा आढावा घेण्यात आला.
मतगणना प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असल्याने कोणतीही त्रुटी होऊ नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
यानंतर आयुक्तांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन मतगणनेचे टप्पे, वेळेचे नियोजन, विभागीय समन्वय, माहिती संप्रेषण व तक्रार निवारण याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.
मतगणना प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाशी समन्वय ठेवण्यावरही भर देण्यात आला.
प्रशासनामार्फत मतगणना प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पाहणी व बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विविध विभागांचे प्रमुख तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




