आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व त्रुटीविरहित पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने क्षेत्रीय अधिकारी (ZO) यांच्यासाठी ई.व्ही.एम. (Electronic Voting Machine) विषयक सविस्तर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
हे प्रशिक्षण निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडले.
प्रशिक्षणादरम्यान ई.व्ही.एम. मशीनची रचना, कार्यपद्धती, मतदानपूर्व तयारी, मतदान दिवशीची प्रक्रिया, मतमोजणीपूर्व साठवणूक, तसेच नियम व मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यात आली.
प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे अधिकाऱ्यांना ई.व्ही.एम. हाताळणीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्णतः निष्पक्ष व पारदर्शक ठेवण्यावर भर देत, राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन, ई.व्ही.एम. मशीनची सुरक्षित हाताळणी, सीलिंग व साठवणूक, लेखी नोंदींचे अद्ययावतीकरण आणि वेळेचे अचूक नियोजन करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
आपत्कालीन परिस्थितीत संयमाने व नियमानुसार कार्यवाही करून वरिष्ठांशी त्वरित समन्वय साधण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
या प्रशिक्षणामुळे अधिकारी अधिक सज्ज होतील व निवडणूक प्रक्रिया अधिक सुरळीत, विश्वासार्ह व लोकशाही मूल्यांना अनुरूप पद्धतीने पार पडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रशिक्षण कार्यक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







