अमरावती महानगरपालिकेच्या स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमांतर्गत नागरिकांना मतदार यादीतील नाव व मतदान केंद्राची माहिती सहज आणि जलद मिळावी यासाठी अभिनव QR कोड सुविधा सुरू करण्यात आली आहे. या QR कोडचे उद्घाटन मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमामुळे नागरिकांना मोबाईलद्वारे QR कोड स्कॅन करून काही क्षणांतच मतदार क्रमांक व संबंधित मतदान केंद्राची अचूक माहिती मिळणार आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतदारसंख्या वाढल्याने काही मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यात आले असून, त्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी गोंधळ किंवा गैरसोय टाळण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
शहरातील बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे व वर्दळीच्या परिसरात हे QR कोड उपलब्ध करून देण्यात आले असून, यामुळे विशेषतः युवक, ज्येष्ठ नागरिक व पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.
मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून, माहितीअभावी कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, असा संदेश देत मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अधिकाधिक नागरिकांनी या QR कोड सुविधेचा वापर करून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले आहे.
