मजबूत लोकशाहीसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार; अमरावती मनपात मतदार जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांची समन्वय बैठक

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मतदार जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली.

ही बैठक बुधवार, 7 जानेवारी 2026 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाली.

या बैठकीत मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी मार्गदर्शन करत सामाजिक संस्थांची भूमिका लोकशाही प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले.

समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्याची क्षमता सामाजिक संस्थांकडे असून, त्यांच्या सक्रिय सहभागातून 100 टक्के मतदानाचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीदरम्यान नवमतदार, युवक, महिला, ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी विशेष जनजागृती उपक्रम, रॅली, जनसंवाद, डिजिटल माध्यमांचा वापर तसेच प्रत्यक्ष संपर्क मोहिमा राबविण्याबाबत चर्चा झाली.

यावेळी काही हॉटेल व आस्थापनाधारकांनी मतदान जनजागृतीसाठी विशेष सवलती जाहीर केल्या असून, शनिवार 10 जानेवारी 2026 रोजी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सर्व सामाजिक संस्थांनी निष्पक्ष व आचारसंहितेच्या चौकटीत समन्वयाने काम करून नागरिकांना मतदानासाठी प्रेरित करावे, असे आवाहन केले. बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी मतदानाची शपथ घेतली.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मनपाचे अधिकारी-कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top