पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जागृतीला प्रभावी प्रतिसाद; स्वीप उपक्रमांतर्गत अमरावतीत नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देणारा अभिनव उपक्रम

अमरावती महानगरपालिकेच्या स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी वडाळी, यशोदा नगर, उत्तम नगर, चैतन्य कॉलनी, साईनगर व विलास नगर परिसरात पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले.

मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व, मतदान हा नागरिकांचा कर्तव्यभाव तसेच योग्य उमेदवाराची जाणीवपूर्वक निवड करण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

पथनाट्यांद्वारे सोप्या व प्रभावी शैलीत मतदान प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, विशेषतः नव मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

पहिल्यांदाच मतदान करणारे युवक-युवती 15 जानेवारी रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सजगपणे मतदान करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले.

स्वीप उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या पथनाट्यांमुळे मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असून, आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास मनपा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top