ई.व्ही.एम. सिलींग प्रक्रिया सुरळीत सुरू; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची सातही झोनमध्ये पाहणी

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियमबद्ध राहावी यासाठी प्रशासनाकडून काटेकोर तयारी सुरू आहे.

त्याचाच भाग म्हणून गुरुवार, दि. ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मनपाच्या झोन क्रमांक १ ते ७ येथील सुरक्षा कक्षांमध्ये ई.व्ही.एम.मधील बॅलेट युनिट (BU) व कंट्रोल युनिट (CU) सिलींग प्रक्रियेला अधिकृत सुरुवात करण्यात आली.

निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सर्व झोनमध्ये प्रत्यक्ष भेटी देत सिलींग प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन होत असल्याची त्यांनी खात्री करून घेतली.

सिलींग प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक पद्धतीने पार पडत असून, अधिकृत निवडणूक कर्मचारी, संबंधित अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच सुरक्षादलाचे कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक ई.व्ही.एम.ची तपासणी, नोंद व सीलबंद प्रक्रिया नियमानुसार करण्यात येत आहे.

यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा असून प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता, तटस्थता व शिस्त पाळणे अत्यावश्यक आहे.

ई.व्ही.एम. सिलींग प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून, पुढील सर्व टप्पे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वेळेत व सुरळीतपणे पार पाडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top