अमरावतीत मतदान जनजागृतीसाठी भव्य रॅली; शंभर टक्के मतदानाचा निर्धार

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शनिवार, दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी भव्य मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध व शांततेत यशस्वीरीत्या पार पडली.

निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 3 वाजता दसरा मैदान येथून रॅलीस प्रारंभ झाला. दसरा मैदान–राजापेठ–राजकमल चौक असा रॅलीचा मार्ग होता.

या रॅलीत शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षकवर्ग, व्यापारी, उद्योजक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. “मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार व कर्तव्य आहे”, “माझे मत – माझा अधिकार” अशा घोषणांनी संपूर्ण मार्गावर लोकशाहीचा संदेश पोहोचविण्यात आला.

रॅलीदरम्यान मतदान जनजागृती गाण्याचे लाँचिंग, 100 फुटांचा तिरंगा, तिरंगी फुगे, पथनाट्य सादरीकरण, रथावरील जनजागृती कार्यक्रम व सेल्फी उपक्रम नागरिकांचे विशेष आकर्षण ठरले. दिव्यांग बांधवांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

राजकमल चौक येथे रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नागरिकांना निर्भय व विवेकबुद्धीने मतदान करण्याचे आवाहन करत शंभर टक्के मतदानाचा संकल्प व्यक्त केला. “प्रत्येक मत लोकशाही मजबूत करते,” असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास अमरावती महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top