अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू आहे.
त्या अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सोमवार, दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी शहरातील विविध मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांनी तक्षशिला कॉलेज, मनपा शाळा वडाळी, मनपा शाळा नागपुरी गेट तसेच ॲकॅडमी स्कूल येथील मतदान केंद्रांना भेट देत तेथील व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक सर्व सुविधांची तपासणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान मतदान केंद्रांतील प्रवेश-निर्गमन मार्ग, बसण्याची व्यवस्था, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प व व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वीज व प्रकाश व्यवस्था, सुरक्षा बंदोबस्त तसेच सीसीटीव्ही यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. तसेच मतदान कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची मांडणी योग्य प्रकारे करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मतदान केंद्र परिसर स्वच्छ ठेवणे, दिशादर्शक फलक स्पष्ट लावणे व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
प्रत्येक मतदाराला निर्भय व सुरक्षित वातावरणात मतदान करता यावे, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी नमूद केले.
या पाहणीवेळी महानगरपालिकेचे विभागप्रमुख, निवडणूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



