स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त अमरावती येथील श्री शिवाजी BPEd कॉलेजमध्ये मतदान जनजागृतीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करणे व युवकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमात कॉलेजमधील विद्यार्थी, खेळाडू, शिक्षक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थितांना मतदान शपथ देण्यात आली तसेच मतदान प्रक्रिया, नागरिकांची जबाबदारी व मतदानातून घडणारे सामाजिक बदल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रम निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
मतदान हा केवळ अधिकार नसून लोकशाहीचा आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित करत नागरिकांनी निर्भयपणे व जबाबदारीने मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमानंतर कॉलेज परिसरातून राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यापर्यंत मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू व नागरिक सहभागी झाले असून घोषणांच्या माध्यमातून मतदानाचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला.
या उपक्रमामुळे स्थानिक समाजात लोकशाहीबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाली असून युवकांमध्ये मतदानासाठी प्रेरणा वाढल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी स्वीप प्लॅन नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ, शाळा निरीक्षक योगेश पखाले व विशेष शिक्षक कैलास कुलट उपस्थित होते.


