अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व त्रुटीरहित पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे.
त्याच अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सातही झोनमध्ये मतमोजणीसंदर्भातील सखोल प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले.
या प्रशिक्षणात मतमोजणी अधिकारी, सहाय्यक अधिकारी, पर्यवेक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेतील सर्व टप्पे, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, ईव्हीएम हाताळणी, मतमोजणीदरम्यान घ्यावयाची खबरदारी, अभिकर्त्यांशी समन्वय तसेच आकस्मिक परिस्थितीतील उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून मतमोजणी प्रक्रिया समजावून सांगताना पारदर्शकता, नियमांचे काटेकोर पालन व जबाबदारीची भावना महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
दरम्यान, प्रशिक्षणातील सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी तपासण्यासाठी मंगळवार, दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी केंद्रावर रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्यात येणार आहे.
या तालिमेद्वारे संभाव्य त्रुटी व अडचणी आधीच लक्षात घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात येणार आहेत.
महानगरपालिका निवडणूक शांततापूर्ण, पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून सर्व अधिकारी व कर्मचारी समन्वयाने कार्यरत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

