अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष तयारी करण्यात आली आहे.
या अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अमरावती महानगरपालिका क्रीडा संकुल, नवसारी येथील मतमोजणी केंद्राची सखोल पाहणी केली.
पाहणीदरम्यान मतमोजणी कक्ष, स्ट्रॉंग रूम, मीडिया सेंटर, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश–निर्गमन मार्ग, वाहतूक व पार्किंग नियोजन तसेच आपत्कालीन सेवांचा आढावा घेण्यात आला.
सातही झोनसाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून निकाल थेट एलईडी स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहेत.
ईव्हीएम व मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी स्ट्रॉंग रूममध्ये बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख व कडक प्रवेश नियंत्रण ठेवण्यात आले आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी व अभिकर्त्यांसाठी स्वतंत्र व सुव्यवस्थित निरीक्षण व्यवस्था करण्यात आली आहे.
माध्यम प्रतिनिधींकरिता सुसज्ज मीडिया सेंटर उभारण्यात आले असून इंटरनेट, वीजपुरवठा व माहिती सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
15 व 16 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान पत्रकारांना वेळेवर माहिती मिळण्यासाठी स्वतंत्र समन्वय यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, “मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही त्रुटी होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रत्येक स्तरावर दक्षता घेतली असून नागरिकांचा जनादेश अचूक व पारदर्शक पद्धतीने प्रतिबिंबित होईल.”
या पाहणीवेळी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी व निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


