शहरातील वाढती अतिक्रमणे ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून रस्ते, फूटपाथ व सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांमुळे वाहतूक, स्वच्छता व सुरक्षिततेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त मा. सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार शहरात अतिक्रमण हटाव धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या अल्टिमेटमनंतर अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे.
दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी जेसीबी व ३ ट्रकच्या सहाय्याने चित्रा चौक, इतवारा बाजार, टांगा पडाव, चांदनी चौक, नागपुरी गेट, जमील कॉलनी, वलगाव रोड, चौधरी चौक, मालवीय चौक, रेल्वे स्टेशन चौक परिसर येथे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.
शहरातील रस्ते व फूटपाथ पूर्णतः मोकळे होईपर्यंत ही मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे.
अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी तात्काळ स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा महानगरपालिका प्रशासनामार्फत ते काढून टाकण्यात येईल व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
तसेच शहरातील मुख्य कापड बाजार व मध्यवर्ती भागातील अतिक्रमणांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा महानगरपालिकेचा निर्धार आहे.



