अमरावती महानगरपालिकेत भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक (भा.प्र.से.) यांच्या हस्ते सकाळी ८.१५ वाजता ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मान्यवर नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी, अभियंते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ध्वजारोहनानंतर आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून आत्मपरीक्षण आणि पुढील वाटचालीचा संकल्प करण्याचा दिवस आहे.
मागील वर्ष हे अमरावती शहरासाठी निर्णायक कृती आणि प्रत्यक्ष बदलांचे वर्ष ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले.
महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या “अमृत अंबानगरी – स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट अमरावती” या अभियानाअंतर्गत शहराच्या स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि स्मार्ट प्रशासन या तीन प्रमुख दिशांमध्ये लक्षणीय प्रगती झाल्याचा आढावा त्यांनी घेतला.
स्वच्छतेच्या क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन बळकट करणे, Garbage Vulnerable Points पूर्णतः निर्मूलन, सिंगल-यूज प्लास्टिकवर कारवाई, RRR सेंटर्सची स्थापना यासारख्या उपाययोजना राबवण्यात आल्या.
शहर सुशोभिकरणासाठी अतिक्रमणविरोधी मोहिमा, नियोजित हॉकर्स झोन्स, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, कृत्रिम विसर्जन तलाव यशस्वीपणे राबवण्यात आले.
स्मार्ट प्रशासनासाठी WhatsApp Chatbot, ई-ऑफिस, ब्लॉकचेन-आधारित सेवा, GIS व रिमोट सेन्सिंगवर आधारित Cool Roof By-laws यांचा प्रभावी वापर करण्यात आला.
या सर्व प्रयत्नांची दखल घेत Clean Air Quality Survey 2025 मध्ये ३ ते २० लाख लोकसंख्या गटात अमरावती शहर देशात प्रथम क्रमांकावर राहिले असून २०० पैकी २०० गुण प्राप्त झाले. तसेच भारत सरकारकडून ₹७५ लाखांचे पारितोषिक महानगरपालिकेला मिळाले.
यावेळी पर्यावरणपूरक गणेश मंडळ स्पर्धा २०२५ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांचा तसेच परीक्षण समिती सदस्यांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तसेच चिखलदरा अपघातातील बचाव कार्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अग्निशमन कर्मचाऱ्याचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यगीत व राष्ट्रगीताचे सादरीकरण, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यात आले.
शेवटी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, “स्वच्छता, शिस्त आणि पर्यावरण ही मोहीम न राहता आपली सवय बनली पाहिजे. प्रशासन व नागरिकांनी एकत्र येऊन स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट-सक्षम अमरावती घडवण्यासाठी पुढे जावे.”







